सातारा – मुलाचे लग्न जमवण्याच्या बहाण्याने येथील शनिवार पेठेतील एका घरात जाऊन 80 हजार रुपये किमतीचे 22 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बुवा एकनाथ घोलप (रा. रहिमतपूर) याला शाहूपुरी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी जिल्ह्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी राहुल अशोक थिटे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल थिटे दि. 21 रोजी कामावर गेले होते. त्या दिवशी त्यांचे आई-वडील दोघेच घरी होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने थिटे यांच्या आई सौ. शोभा थिटे यांना एक पत्ता विचारून प्यायला पाणी मागितले. पाणी दिल्यावर घरात कोण कोण राहता, असे संशयिताने विचारले. माझ्या सुनेचे निधन झाले असून सध्या मी, मुलगा, नातू व पती असे चार जण राहतो, अशी माहिती थिटे यांच्या आईने दिली. त्यावर मी तुमच्या मुलाचे लग्न जमवून देतो, असे सांगत मंगळसूत्र, दोन ग्रॅम वजनाची कर्णफुले असे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकाने पळवून नेले होते.
त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सोने विकत घेणाऱ्या सराफाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून शनिवार पेठेतील गुन्ह्यासह इतर गुन्ह्यातील असे 15 तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. यातील सराफाला जामीन झाला असून घोलप याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.