वॉशिंग्टन – भारतात कार्यरत असलेल्या अनेक अमेरिकन नागरिकांनी मायदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना अमेरिकेत परत आणण्यासाठी अमेरिकेचे प्रशासन भारत सरकारशी समन्वय साधत आहे अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
विदेश व्यवहार विभागाशी संबंधीत एक अधिकारी ईयान ब्राउनली यांनी सांगितले की, आम्ही जगातल्या 50 देशांतून आमचे सुमारे 25 हजार नागरीक मायदेशी आणले आहेत. अमेरिकेचे सुमारे नऊ हजार नागरिक भारतात थांबले असून त्यांनी मायदेशी परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना परत आणण्यासाठी आम्ही भारत सरकारशी समन्वय साधून आहोत असे त्यांनी नमूद केले. अशियातील अनेक देशांमधील आमच्या नागरिकांनीही मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आम्ही बांगलादेशातून आमचे नागरिक परत आणण्यासाठी विमान पाठवले असून हे विमान आजच मायदेशी येत आहे. असाच प्रयत्न भारतातील नागरिक परत आणण्यासाठी केला जात आहे असेही त्यांनी नमूद केले. पुढील आठवडाभारत आम्ही आणखी शंभर विमाने जगभरातील विविध देशांमध्ये आमचे नागरिक परत आणण्यासाठी पाठवत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या भारतीय दुतावासाने सांगितले की, मुंबई आणि दिल्लीतून आम्ही अनेक विमाने अमेरिकेसाठी सोडणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. ही विमाने सेवा मोफत नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.