पिरंगुट(प्रतिनिधी) – भोडे (ता. मुळशी) येथील तीन वर्षाच्या वेद सचिन मारणे या चिमुकल्याने मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उशाशी असलेला तुंग किल्ला अवघ्या चाळीस मिनिटांत सर केला. शिवजयंतीच्या चार दिवस अगोदरपासूनच वेदला किल्यावर जायचे वेध लागले होते. करोनामुळे बहुतेक किल्ल्यांवर प्रतिबंध असल्यामुळे तुंग हा किल्ला निवडण्यात आला.
तुंग किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. दुर्गम आणि कठीण असलेल्या या किल्ल्यावर वेदने कुणाचाही आधार न घेता चढाई केली. यावेळी त्याचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देत उमेदीने त्याने हा किल्ला सर केला. त्याचा उत्साह आणि चढाईची लकब पाहून किल्ल्यावर आलेले पर्यटक, तसेच शिवप्रेमींकडून त्याचे आवर्जून फोटो आणि व्हीडीओ काढले गेले आणि त्याचे कौतुकही केले गेले.
वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच वेदला त्याच्या आई वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबद्दल गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे वेदमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या किल्ल्यामध्ये प्रचंड आवड निर्माण झाली. यापूर्वी त्याने बऱ्याच किल्ल्यांवर चढाई केली आहे. वेदला गणेश स्तोत्र पाठ करण्याची खूप आवड आहे. त्याचे संस्कृतमधील गणेश मंत्रही पाठ आहेत.
याबाबतची वेदची आजी विमल मारणे म्हणाल्या, वेदला लहानपणापासूनच शिवाजी महाराज आणि शूर वीरांच्या कथा, व्हीडीओ, गाणी, पोवाडे, तसेच देवादिकांच्या कथा, मंत्र ऐकण्याची व म्हणण्याची आवड आहे. तुंगी किल्ल्यावर चढताना त्याचा उत्साह थक्क करणारा होता. कुणाचाही आधार न घेता त्याने हा किल्ला चाळीस मिनिटांत सर केला. त्याच्या तीन वर्षे वयाच्या मानाने त्याने अभिमान वाटेल अशीच कामगिरी केली आहे.