पेशावर – पाकिस्तानमध्ये स्वयंसेवी संस्थेच्या चार कार्यकर्त्या महिलांच्या हत्येशी संबंधित तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेच्या कमांडरचा पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला आहे. हसन उर्फ सजना असे या कमांडरचे नाव होते. मंगळवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील आदिवासी भागातील मीर अली भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सजनाला गोळ्या घालण्यात आल्या, असे पाकिस्तानी सैन्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सजना हा तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या हाफिझ गुल बहादुर गटात सक्रिय होता. सोमवारी मिराली येथील स्थानिक महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या चार महिला कार्यकर्त्यांची उत्तर वझिरीस्थानमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये सजनाचाही सहभाग होता. सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर हल्ले, लक्ष्य हत्या आणि खंडणी यातही तो सामील होता, असे पाक सैन्याच्या सूत्रांनी सांगितले.