रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर नगरपरिषदेच्या 2020-21 च्या अंदाजपत्रकानुसार 5 टक्के प्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभ 9 हजार रुपये प्रमाणे 104 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित एकूण नऊ लाख 36 हजार रुपये आरटीजीएस द्वारे त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे याचे औचित्य साधत,बुधवार (ता. 24 रोजी) दिव्यांग बांधवाकडून इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा तसेच नगरसेवक भरत शहा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्यांग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, अनंत गायकवाड, सचिन सूर्यवंशी, भोसले, अमीर शेख, रत्नपाल पाडुळे उपस्थित होते.दरवर्षी नियमित इंदापूर नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग लाभार्थ्यांनाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत असल्याने या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत इंदापूर नगरपालिका आणि नगराध्यक्षा, नगरसेवक, कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
दिव्यांग बांधव यांच्यासाठी केलेले काम खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असते समाजातील अशा घटकांना मी कदापि विसरणार नाही.व शासनाच्या सर्व योजना इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवित नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न इंदापूर नगरपरिषदेचा असतो अशी प्रतिक्रिया यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.