जम्मू : जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी आज हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली. हे तिघेही दहशतवादी कारवायांशी संबंधित चार वेगवेगळ्या घटनांशी संबंधित होते. त्यामध्ये किश्तवाडमधील भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्याच्या हत्येचाही समावेश आहे, असे पोलीसांनी सांगितले.
निसार अहमद शेख असे या दहशतवाद्यांच्या म्होरक्याचे नाव असून त्याच्या समवेत निशाद अहमद आणि आझाद हुसैन या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण किश्तवाडचेच रहिवासी आहेत.
या तिघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर ते या वर्षी सप्टेंबर दरम्यान केलेल्या दहशतवादी कृत्यांच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली असल्याचे जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले. चिनाब खोऱ्यात सन 2017-18 मध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या इतर सक्रिय अतिरेक्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.