संशयित बीड जिल्ह्यातील; सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त
कराड – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागत रॅलीत झालेल्या गर्दीत खादीचे पांढरे कपडे घालून मिसळत लोकांच्या सोनसाखळ्या, पाकिटे लांबवणाऱ्या तीन चोरट्यांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून बीड जिल्ह्यातील गांधीनगरातून संशयितांना अटक केली.
चोरट्यांकडून सोने व रोख रक्कम मिळून दोन लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व कर्मचारी उपस्थित होते.
सूरज गुरव म्हणाले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागतासाठी कराड शहरात रॅली काढण्यात आली होती. काही चोरटे खादीचे पांढरे कपडे घालून त्या रॅलीत सहभागी झाले होते. ते रॅलीत ना. पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांच्या मागेपुढे करत होते. मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना हेरून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व काहींची पाकिटे हातचलाखीने लांबवली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील चोरट्यांची चौकशी केली.
रॅलीचे चित्रीकरण तपासल्यावर चोरट्यांचे चेहरे दिसले. त्यावरून संशयितांचा शोध घेतला. त्यासाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सोशल मीडियातून संशयितांचे फोटो पाठवले. त्यानंतर अबू उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर व अन्य एक जण पेठ बीड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विजय गोडसे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, संजय जाधव यांच्या पथकाने बीडमधील गांधीनगरातून अबू उर्फ नवनाथ भीमराव उपळकर (वय 50, रा. गांधीनगर, बीड), नितीन अंकुश गायकवाड (वय 30, रा. सुभाष कॉलनी, पेठ बीड) व बाबू रामा इटकर (वय 50, मूळ रा. गांधीनगर, सध्या रा. शिरूर, बीड) यांना अटक केली.