सातारा – जिल्ह्यात दरोडा, जबरी व घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलीस दलाने पर्दाफाश करत चोरीतील 35 लाख 84 हजार रुपये किंमतीचे तब्बल 64 तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून संशयित सराईत गुन्हेगार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे.
चॉंद उर्फ सुरज जालिंधर पवार (वय 22, रा. काळज), पृथ्वीराज युरोपियन शिंदे (वय 25, रा. ठाकुरकी), चिलम्या उर्फ संदीप महावीर उर्फ माळव्या शिंदे (वय 22, रा. सुरवडी सर्व ता. फलटण) अशी संशयितांची नावे असून आणखी इतर तीन संशयितांचा शोध सुरु आहे. सातारा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबतची माहिती दिली. लोणंद पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) करत होते. गेले आठ दिवस चॉंद उर्फ सुरज पवार याचा पोलिस शोध घेत होते. तो काळज गावचे हद्दीतील बडेखान या ठिकाणासह इतर ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याच्यावर वॉच ठेवून पकडल्यानंतर एलसीबी पथकाने त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली असता त्याने
साथीदारांसोबत दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करुन इतर संशयितांची धरपकड केली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली. यामुळे पोलिसांना तपास करण्यास अधिक वेळ मिळाला. संशयितांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर एकेका गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात झाल्यानंतर संशयितांनी दिलेल्या माहितीने पोलिसही हादरुन गेले. कारण एकामागून एक अशा 21 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. संशयितांनी दिलेल्या कबुलीनंतर खातरजमा करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यात गेलेल्या मुद्देमालापैकी 46,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले हत्यार कोयता हस्तगत केला.
त्यानंतर पुढे आणखी 20 गुन्ह्यांतील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण (चालू बाजारभावाप्रमाणे) 36,74,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, विजय जाधव, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, दीपाली यादव, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, स्वप्नील माने, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, सचिन ससाणे, पंकज बेसके, गणेश कचरे, राजू कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ज्योती शिंदे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.