पुणे – भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्याला मोहिमेला खातेदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल सातबारा प्राप्त झाला आहे.
भूमी अभिलेख विभागाने राज्यातील 2 कोटी 5 लाख सातबारे उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले आहे. तर सातबारा उताऱ्यांसाठी नागरिकांना ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेले हे सातबारे उतारे सर्व कायदेशीर व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहिलेली नाही.
भूमि अभिलेख विभागाकडून सातबारे, फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी सातबारे उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच ई फेरफार अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली जात आहे. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून नागरिकांना ऑनलाईन सातबारे उतारे उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामध्ये आणखी एक पाऊल टाकत भूमी अभिलेख विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मोहीम सप्टेंबरपासून सुरू केली. संकेतस्थळावरही डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे मिळत आहे.
उर्वरित सातबारा उतारे लवकरच ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 86 टक्के सातबारे उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत.