आग्रा – आग्रा येथील एतमदौला भागातील नुनिहाई पोलीस चौकीजवळ मोपेडवर आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. या अपघातात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्ठळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातानंतर रविवारी सकाळी संतप्त मृताच्या नातेवाइकांनी पोलिस चौकीजवळ गोंधळ घातला आहे.
पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक देवेंद्र शंकर पांडे यांनी सांगितले की, अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गोपालपुरा, शमशाबाद येथील रहिवासी प्रेम राठोड, तुलसी चबुतरा (ताजगंज) येथील रहिवासी अंकित राठोड आणि सीता नगर येथील हर्ष राठोड यांचा समावेश आहे. तिघेही मोपेडवर होते. रात्री एका कार्यक्रमातून ते येत होते. तेव्हा एका वाहनाने त्यांना धडक दिली.
या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी धाव घेतली. या घटनेमुळे मृत युवकांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे. रविवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी नुनिहाई चौकीत पोहोचून गोंधळ घातला. अपघातास कारणीभूत वाहनास पकडण्याची व कडक शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.