शिरूर – शिरूर तालुक्यातील म्हसे बु. येथे मुरूम चाळून दिला नाही या रागातून डोक्याला रिव्हॉल्वर लावून तिघा जणांना तलवार, गज, काठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी नऊ जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय वेताळ, विकास जवान वेताळ, गणेश सदाशिव वेताळ, निलेश सदाशिव वेताळ, केतन कैलास वेताळ, मयूर वेताळ, गणेश वेताळचा दाजी (नाव माहिती नाही), पप्पू वेताळ, योगेश वसंत वेताळ, प्रदीप अमृत वेताळ (सर्व रा. म्हसे बुद्रुक, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रवीण सुरेश मुसळे (वय 24, रा. म्हसे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
10 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास म्हसे गावच्या हद्दीमध्ये श्रीधर मुसळे यांच्या दुकानासमोर प्रवीण मुसळे थांबले असताना स्विफ्ट कार, पल्सर, बुलेट, करिज्मा या वाहनांमधून आरोपी आले. यातील विकास जवान वेताळ याने पिस्तूल काढून प्रवीणच्या डोक्याला लावत तुम्हाला लय माज आला का, रात्री मुरूम चाळून दिला नाही.
तुला ठारच मारतो, असे म्हणत दमदाटी करून त्यांनी हातातील रॉडने मारले. अक्षय वेताळने तलवारीने डोक्यावर वार केला. इतरांनी जबर मारहाण केली. प्रवीणसोबत असलेले श्रीधर मुसळे, गणेश मुसळे यांनाही मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली.