मुंबई – अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता पुन्हा एकदा सलमानला धमकीचा फोन आला आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे सलमानला कधी मारणार ती तारीख देखील सांगितली आहे.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री 9 वाजता हा धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने व्यक्तीने रॉकी भाई अशी स्वत: ची ओळख सांगितली होती. तसेच तो जोधपूरचा राहणारा असून तो एक गोरक्षक असल्याचे त्याने सांगितले. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने सलमान खानला 30 तारखेला मारणार असल्याचे सांगितले. या व्यक्तीने “30 तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून ठेवा” असे पोलिसांना कॉलवर सांगितले. सध्या या व्यक्तीचा पोलिस तपास घेत आहेत.
याआधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपविण्याची धमकी दिली होती. सलमानला जीवे मारणे हे त्याचे ध्येय असल्याचेही त्याने सांगितले होते. सलमान खानला काळवीटाच्या घटनेबद्दल बिष्णोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा लॉरेन्स बिश्नोईने जेलमधून दिला होता. यानंतर सलमान खानला अलीकडेच ई-मेलद्वारे धमक्या आल्या होत्या. अशात सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
सलमानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार
सलमानने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. ही नवीन कार परदेशातून आयात केली आहे. निसान पेट्रोल एसयूव्ही असे या कारचे नाव आहे. विशेष म्हणजे ही कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. ही कार दक्षिण आशियातील बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि महागड्या एसयूव्हीपैकी एक मानली जाते. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ही कार खास असल्याचे समजते.