मुंबई – शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचं तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. आता यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया आली आहे.
चित्र वाघ यांनी म्हटलं की, संबंधित मुलगी फेब्रुवारी महिन्यात माझ्याकडे आली होती. तिने मला सर्व पुरावे आणि तिच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल मला सांगितले. त्यानंतर मी या मुलीच्या बाजूने लढायचा निर्णय घेतला.
मुलीनेच माझ्यावर आरोप केल्यानंतर इतर पक्षांतील महिला नेत्या एकटवल्या आहेत. मी पीडित मुलीला मदत करण्याचा निर्णय घेतला, ही माझी चूक होती का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी तरुणीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान हे संपूर्ण प्रकरण राजकीय कारस्थान असल्याचाही दावा करत चित्रा वाघ यांनी सरकारला आव्हान दिलं आहे. तुम्ही हे सगळं करून माझा आवाज बंद कराल, असे वाटत असेल तर, तो तुमचा गैरसमज आहे. सरकार मला अशा केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्यासाठी तयार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.