वेलिंग्टन: न्यूझीलंडमधील करोनाचा शेवटचा पेशंटही आज बरा होऊन घरी गेल्याने हा देश आता करोना मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या देशात गेल्या 17 दिवसांत करोनाचा कोणताही नवीन पेशंट आढळून आलेला नाही. न्यूझीलंडमध्ये आता विदेशातून परत आलेल्या नागरिकांमध्येच करोना आढळून येऊ शकतो अन्यथा येथील स्थनिकांना ती बाधा होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यूझीलंडने विदेशी नागरिकांसाठी आपली सीमा पूर्ण बंद केली आहे. केवळ मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या लोकांनाच येथे काही अटींवर आता प्रवेश दिला जात आहे. हा देश पूर्ण करोनामुक्त झाला असला तरी त्या संबंधातील काळजी घेणे आम्ही सुरूच ठेवणार आहोत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यूझीलंडमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान जॅकिंडा आर्डेन यांनी देशात कडेकोट लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर शिस्तबद्ध प्रयत्न करून त्यांनी या रोगाचा प्रसार पूर्ण आटोक्यात आणला. त्या देशातील 1500 लोकांना करोनाची लागण झाली होती व त्यात किमान 26 जणांना प्राण गमवावे लागले होते.