आमदार अशोक पवार यांचा पुढाकार
शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथील प्रशांत अनिल दरेकर या अठ्ठावीस वर्षीय युवकाच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून उपचारासाठी तब्बल तेरा लाख रुपये मदत शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने मिळाली आहे. आमदार पवार यांच्या प्रयत्नामुळे दरेकर कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सणसवाडी येथील प्रशांत अनिल दरेकर यांच्या युवकावर पुणे येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु दरेकर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना प्रशांत यांच्यावरील पुढील उपचार घेणे अवघड झाले होते. याबाबत जिजामाता सहकारी बॅंकेचे संचालक पंडित दरेकर व माजी उपसरपंच शिवाजी दरेकर यांनी ही बाब आमदार पवार यांना सांगितली, त्यानंतर आमदार पवार यांनी धर्मादाय कार्यालयात संपर्क साधून माहिती घेतली. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संगणक प्रणालीवर चार खाटा मोफत उपचारासाठी शिल्लक असल्याची माहिती घेतली. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करून प्रशांत दरेकर यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून उपचारासाठी तब्बल तेरा लाख रुपयांची मदत मिळवून दिली.
उपचारासाठी मदत मिळाल्यामुळे प्रशांत दरेकर याच्यावर पुणे येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करीत उपचार करण्यात आले आहेत. प्रशांतवर उपचार झाल्यानंतर आमदार पवार यांनी दरेकर कुटुंबीयांची भेट घेऊन प्रशांतच्या प्रकृतीची विचारपूस केली. अजूनही मदत लागल्यास आपण ती मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी जिजामाता बॅंकेचे संचालक पंडित दरेकर व माजी उपसरपंच शिवाजी दरेकर उपस्थित होते.