नवी दिल्ली: देशातले शास्त्रज्ञ हे करोनाविरोधतली लस शोधण्यासाठी वेगाने कार्य करत आहेत. जानेवारीमध्ये आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात 1300 लॅब्स आहेत. तर देशभरात पाच लाख टेस्ट रोज होत आहेत, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक लॅबचे उद्घाटन केले. यानंतर ते बोलत होते. आपल्या देशातले शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत, असेही मोदींनी म्हटले आहे.
मोदी म्हणाले, करोनाच नाही तर इतर प्राणघातक आजारांवरही ही लस उपयोगी ठरेल. करोना विरोधात लढण्याचा संकल्प घेऊन सगळा देश काम करतो आहे. सध्या रोज देशभरात 5 लाख चाचण्या होत आहेत. त्या चाचण्या 10 लाखांपर्यंत घेऊन जाण्याचं आमचं उद्दीष्ट आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.