विचार – गंध आठवणीतील

अमोल भालेराव

संध्याकाळची वेळ, ऑफिसमधून घरी चाललो होतो. त्या दिवशी आभाळ चांगलेच भरून आले होते. हवेतील गारवा थोड्याच वेळात पाऊस पडणार असल्याची चाहूल देत होता. आणि केतकी म्हणजे माझी बायको म्हणते तसं, मला निमित्त मिळालं चहा घेण्याचं! मग काय, रोडच्या बाजूलाच एका हॉटेलवर गाडी थांबवली. ‘वेटर, एक मस्तपैकी गरमागरम चहा, प्लीज.’ मी जेवढ्या उत्साहात ऑर्डर दिली, तेवढ्याच उत्साहात माझ्यासमोर हातात चहाचा वाफाळलेला कप घेऊन वेटर हजर झाला आणि समोर साक्षात वरुणराजेही! हातातील कपाची उब घेताना आणि चहाचा एकएक घोट घेताना त्यात आणखी एका गोष्टीची भर पडत होती. पावसाच्या सरींनी भिजलेल्या मातीच्या गंधाची! एक दीर्घ श्‍वास घेताना त्या गंधाने माझं शरीर आणि मन दोन्ही व्यापून टाकलं. का कुणास ठाऊक, पण तो गंध मला खूप जवळचा वाटत होता, कशाची तरी आठवण करून देणारा! जिभेवर रेंगाळत असणारी चहाची चव आणि मनात दरवळत असणारा हा आठवणीतला गंध घेऊन माझा प्रवास चालू झाला.

हळूहळू तो गंध अधिकच गडद होत गेला. माझ्याबरोबरच त्याचाही प्रवास मनापासून हृदयापर्यंत कधी येऊन पोहचला ते कळलंच नाही. आणि मग हृदयात साठवलेल्या आठवणी अशा काही दाटून आल्या की, क्षणार्धात मला तो गंध कुठेतरी दूर घेऊन गेला. माझ्या गावच्या मातीत! त्या मातीत, जिथं मी माझा पहिला श्‍वास घेताना तिला माझ्या आत कायमचंच साठवून घेतलं होतं. त्या मातीत, जिथं माझ्या इवल्याशा पावलांना पहिल्यांदा उमटलेलं पाहताना आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्या मातीत, जेव्हा खेळता खेळता गुडघ्यावर पडल्यानंतर झालेल्या जखमेवर तिचाच चिमूटभर आधार घेऊन तात्पुरती मलमपट्टी केली होती. त्याच मातीत, जिने दगडांना एकसंध ठेवत आम्हाला राहायला घर दिलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या घराला घरपण! डोळ्यासमोर आनंदानं भरलेलं गोकुळ आठवलं. आणि पुन्हा एकदा आठवला तो नात्यातला गंध. कैरीच्या आंबट लोणच्याचा, गोड अशा मुरंब्याचा आणि दिवाळीतल्या गोड शंकरपाळ्यांचा गंध हा खरं तर आजीच्या वात्सल्याची आठवण करून देत होता. लहानपणी आजीच्या बटव्यातील पैसे घेताना चोरी पकडली जायचीच. कारण, बटवा उघडला कि कोपऱ्यात दडून बसलेल्या तिच्या तपकिरीचा गंध आमच्या नाजूक नाकाला चांगलाच झोंबायचा! हाताला येऊ नये म्हणून आंब्याची पेटी वर माळ्यावर ठेवलेली असायची. पण तरीही आमच्या नाजूक आणि तेवढ्याच तीक्ष्ण नाकाला त्यांचा वास लागल्याशिवाय राहायचा नाही! आमरसाबरोबर पुरणपोळी खाताना आजोबांच्या पिळदार मिशांवर लागलेला रस पाहून आम्हाला हसायला यायचं आणि आम्हाला हसताना पाहून त्यांना स्वतःलाही हसू नाही आवरायचं.

संध्याकाळी आई अंगणात शेणाचा सडा टाकायची. त्यावेळेस शेणाचा साधा वास जरी आला तरी तोंड वेडंवाकडं व्हायचं , पण आज मात्र पुन्हा एकदा मनाची पावलं आपसूक त्या अंगणाकडं वळली. रांगोळीने नटलेल्या अंगणात मधोमध उभी असलेली तुळस आणि तुळशीसमोर ‘दिव्या दिव्या दिपोत्कार, कानीं कुंडलें मोतीहार,’ म्हणून तुळशीला आणि आईला नमस्कार करताच, हातावर प्रसाद म्हणून मिळालेली साखर आठवताना तो क्षण आजही तेवढाच गोड वाटत होता. कधीतरी रात्री माडीवर जेवणाची पंगत बसायची. आजचे ‘कॅण्डल लाईट डिनर’ त्यावेळेसच्या ‘कंदील लाईट डिनर’ पुढं फिक्कंच पडेल! त्यात भर पडायची ती दूर आकाशातून लुकलुक करत आमच्या ताटात उजेड करू पाहणाऱ्या चांदण्यांची. ताटात कधी वांग्याची तिखट भाजी त्यासोबत बाजरीची पापुद्रा आलेली गरमागरम भाकरी, कधी झणझणीत पिठलं आणि सोबत ‘स्वीट डिश’ म्हणून आजीने केलेली खीर. हसतखेळत चतकोर एक भाकरी जास्तच जायची, पण कमी नाही. कधीच विसरता नाही येणार खिरीचा तो गोड गंध आणि डोळ्यात पाणी आणणारा पिठल्याचा तो झणझणीत गंध!

कष्ट करून मातीतून सोनं पिकविणाऱ्या वडिलांच्या घामाचा गंध; जवळ घेत प्रेमानं घास भरविणाऱ्या आईच्या वात्सल्याचा गंध; आणि झोपताना पांघरायला मिळालेल्या आजीच्या गोधडीतला उबदार मायेचा गंध..! हृदयातला या साऱ्या आठवणींच्या गंधांचा आता मात्र फक्त भासच उरून राहिला होता. सहज माझी नजर रोडच्या कडेला बसून फुलं विकणाऱ्या मुलावर पडली. त्याच्याकडून मोगऱ्याच्या फुलांचा गजरा विकत घेतला. घरी पोचताच दारावरची बेल वाजवली. केतकीने दार उघडून माझ्या हातातील बॅग घेतली. हातात पाण्याचा ग्लास देत ती किचनमध्ये चहा करायला जाणार, इतक्‍यात मी तिला हाताला धरून जवळ बसवलं. ‘डोळे बंद कर.’ ‘आज काय भलत्याच रोमॅंटिक मूडमध्ये आहेस, काय आणलेस माझ्यासाठी?’ ‘आधी डोळे तरी मिटून घे आणि हात पुढे कर.’ हात पुढे करताच मी तिच्या ओंजळीत गजरा ठेवला.

डोळे न उडताच, ‘आता तूच माळून दे हा मोगरा माझ्या केसात.’ ‘तुला कसं कळलं, मी तुझ्यासाठी…’ माझं बोलणं मधेच थांबवत, ‘गंध, तुझ्या प्रेमाचा जो या मोगऱ्यात मला जाणवला.’ खुललेला चेहरा घेऊन ती किचनमध्ये गेली. चहा करता करता तिचं गुणगुणन चालूच होतं, ‘गंध फुलांचा गेला सांगून,तुझे नि माझे व्हावे मिलन..’ आमच्या प्रेमातल्या आठवणीचा गंध पुन्हा एकदा ताजा करत, मी देखील तिच्या सुरात सूर मिसळत गेलो..!

Leave A Reply

Your email address will not be published.