पर्यटननगरीत पावसाने ‘हजारी’ ओलांडली

पवना धरण साठा 22 टक्‍क्‍यांवर : लोणावळ्यात एक हजार मि.मी. पाऊस

लोणावळा – गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी (दि. 6) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. शहरात शुक्रवारी सकाळी 7 ते शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 111 मिलिमीटर पाऊस मोजण्यात आला आहे. याशिवाय मावळसह पिंपरी-चिंचवड करांची तहान भागविणाऱ्या पवना धरणक्षेत्रात चोवीस तासांत 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातील पडणाऱ्या पावसामुळे धरण साठा 22 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढकाही काळासाठी पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असला तरीही मागील वर्षीच्या सरासरीने पाऊस पडत असून, यावर्षी एक हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने ओलांडला आहे. यंदाचा पाऊस शनिवारी सकाळपर्यंत 1027 मिलिमीटर इतका मोजण्यात आला आहे.

मागील आठवड्यापासून सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे शहरातील तसेच परिसरातील धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. भुशी डॅम पूर्ण भरले असून, तुंगार्ली डॅम, वलवन डॅम, लोणावळा डॅम या धरणाच्या पाणीसाठ्यात त्यांच्या पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. जोरदार पावसामुळे शहराच्या काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. दुसरीकडे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा आणि ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी पर्यटकांनी मोठ्या संख्येने लोणावळ्यात हजेरी लावली होती.

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण क्षेत्रात दिवसभरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. गेल्या चोवीस तासांत 61 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 22 टक्‍क्‍यांवर पोहोचला असून, गतवर्षी आजअखेर 25.43 टक्‍के साठा होता. आजपर्यंत धरणक्षेत्रात 572 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 1.78 टीएमसी पाणीसाठी आहे. धरणक्षेत्रातील संततच्या पावसामुळे पिंपरीकरांना दिलासा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)