राहिले ते मावळे… गेले ते कावळे…

प्रा. डी. के. वैद्य

अकोले – “इतिहासाची पुनरावृत्ती होते’, असे आपण वाचतो. ऐकतो, बोलतो, नव्हे त्याची अनुभूती घेतो. होय ! याची अनुभूती अलीकडचे प्रसंग पाहता नक्की येते. वरील असे विधान म्हणजे निवडणुकीतील वेगवेगळे रंग व संदर्भही दाखवतात. हे मात्र खरे! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच “राहिले ते मावळे…आणि गेले ते कावळे…’ अशा आशयाचे विधान केले. कारण त्यांच्या पक्षातील मातब्बर नेते त्यांची साथ सोडून आता अन्य पक्षांमध्ये स्थिरावत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह, त्या पाठोपाठ पक्षातील माजीमंत्री मधुकरराव पिचड, त्यांचे सुपुत्र मावळते आमदार वैभवराव पिचड त्याचबरोबर साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींनी पक्ष सोडला.

या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ती प्रतिक्रिया दिली. अकोले विधानसभा मतदारसंघात असाच बाका प्रसंग उद्भवला होता. तो 1995 मध्ये. अकोले विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार मधुकरराव पिचड होते. त्यांची त्यावेळी दुखरी नस ओळखून, कार्यकर्त्याप्रती असणारे त्यांचे वागणे पाहून, तेव्हाही व आताही अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव भांगरे, परबतराव नाईकवाडी त्याचबरोबर अन्य मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केली. अपक्ष उमेदवार अशोक भांगरे यांच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.

जेव्हा मुख्य कार्यकर्ते सोडून गेले, तेव्हा पिचड यांनी एक हाती निवडणूक लढवली.त्यांच्यावर निष्ठा असणारे मीनानाथ पांडे यांचा अपवाद सोडला, तर इतर सर्वांनी अशोक भांगरे यांच्या गटामध्ये सामील होणे पसंत केले. तेव्हा सहानुभूतीची लाट आली आणि हा हा म्हणता अशोक भांगरे यांना जनाधार बऱ्यापैकी मिळत असेल असे वाटत असताना पिचड यांनी पठार भाग पिंजून काढला. अकोले तालुक्‍याच्या सर्वच भागांमध्ये असणाऱ्या लोकांना राजूर येथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर अकोले येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पिचड यांनी “राहिले ते मावळे…अन्‌ गेले ते कावळे…’ असे विधान तेव्हा केले होते.आता त्या विधानाची आठवण होत आहे. “राहिले ते मावळे आणि गेले ते कावळे’ या विधानाने इतिहास घडवला.

खऱ्या अर्थाने पिचड पराभूत होणारच असे जाहीर करून त्यासाठी चंग बांधलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. या बंडाची धग खऱ्या अर्थाने पिचड यांना पोहोचणार अशी जागोजाग, गावोगावी चर्चेच्या गुऱ्हाळांमध्ये केंद्रबिंदू म्हणून पिचड राहिले. त्याचा उलट परिणाम झाला. सामान्य माणसात पिचड यांच्याविषयीची लाट पसरली. हा हा म्हणता पराभूत होणार, असे भाकीत फोल ठरले.पिचड 35 हजार 610 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले.
अर्थात “मावळे’ आणि “कावळे’ अशी भाषा करणाऱ्या पिचड यांनी त्यानंतर आकसाचे अन्‌ सुडाचे राजकारण न करता, त्या सर्वांना आपल्याबरोबर घेण्यामध्ये हशील मानले. ते सर्व बंडखोर त्यांच्याबरोबर त्याच पक्षांमध्ये सामील झाले.

पुन्हा एकदा कॉंग्रेसचा प्रवाह वाहू लागला. काळाच्या ओघात मध्ये 1999 साली पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर मधुकरराव पिचड, सीताराम गायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणे पसंत केले. कालपर्यंत पक्ष बदलणार नाही. पक्षातच राहणार. शरद पवार, अजित पवार यांनी केलेल्या मदतीचा वारंवार उल्लेख करून पिचड पितापुत्रांनी पक्षनिष्ठा बदलणार नाही. अशा प्रकारचे भाष्य केले होते. पण काळ व वेळ बदलला आणि त्यांनी हातच्या मनगटीचे घड्याळ काढून ठेवून आपल्या हाती भगवा धरला आहे. आता खरच सांगा शरद पवार म्हणाले आणि एकेकाळी मधुकरराव पिचडही म्हणाले होते… “राहिले ते मावळे…आणि गेले ते कावळे…’ इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती हीच.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×