नवी दिल्ली – भाजपच्या नेत्यांना मला विचारायचे आहे की, तुम्हाला राजकारण आणि वादविवाद कोणत्या स्तरावर न्यायचे आहे? तुमच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून पोस्ट केल्या जाणाऱ्या हिंसक आणि प्रक्षोभक ट्विटशी तुम्ही सहमत असता का? स्वच्छ आणि प्रामाणिक प्रचाराची शपथ घेऊन फार वेळ लोटलेला नाही आणि वचनाप्रमाणे शपथ विसरलात का, अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी भाजपवर टीका केली आहे.
कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी यांच्या छायाचित्रामध्ये फेरफार करुन त्यांना रावणाच्या वेषात भाजपाने ट्वीटरवर सादर केले आहे. त्यावरुन देशभर गदारोळ उडाला आहे. कॉंग्रेसवर टीका करण्यासाठी मुद्दाच न उरल्याने भाजपा आता असे बालिश कृत्य करत असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांत उमटली आहे.
भाजपने गुरुवारी राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला होता, ज्यावर कॉंग्रेसने प्रत्युत्तर देत आपल्या माजी अध्यक्षांविरोधात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. राहुल यांचा फोटो शेअर करताना भाजपने त्यांना धर्मविरोधी आणि रामविरोधी म्हटले होते.आता प्रियांका गांधीही या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही भाजपला फटकारले आहे.
राहुल यांच्या फोटोच्या वर ‘इंडिया इज इन डेंजर’ असं लिहिलं आहे, जो एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे ग्राफिक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या फोटोखाली कॉंग्रेस पार्टी प्रॉडक्शन आणि डायरेक्टेड बाय जॉर्ज सोरोस असेही लिहिले आहे. जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश आहेत आणि भाजप त्यांच्यावर भारताविरोधात अजेंडा चालवल्याचा आरोप करत आहे.