वाह रे पठ्ठ्या ! घरात नव्हती जागा, तर ‘तो’ झाडावरच होता ११ दिवस क्वारंटाईन

हैदराबाद – संपूर्ण देशात करोना संसर्गाचे दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले. अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. घरातील एखाद्याला करोनाचा संसर्ग झाला तर त्याला १४ दिवस क्वारंटाईन अर्थात विलीगीकरणात राहावं लागतं. मात्र अनेकांना जागेअभावी छोट्या घरांमध्ये क्वारंटाईन राहणं अवघड ठरतं. याच समस्येमुळे तेलंगाणा राज्यातील एका तरुणाने करोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी चक्क झाडावर पूर्ण केल्याचं समोर आलं आहे.

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे. येथे एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन राहणं गरजेच होतं. मात्र घरात क्वारंटाईन होण्याची सुविधा नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच 11 दिवस काढले. या तरुणाचं नाव शिवा असून तो १८ वर्षांचा आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र घर लहान असल्यामुळे घरात क्वारंटाईन होणं शक्य नव्हतं. शिवाय घरातील सदस्यांना करोनाची बाधा होण्याचा धोका होता. यावर मार्ग काढत शिवाने घराशेजारी असलेल्या झाडावरच बांबूच्या सहाय्याने मचाण तयार केली. यावर त्याने ११ दिवस पूर्ण केले.

या संदर्भात शिवा म्हणाला की, आमच्या गावात क्वारंटाईन होण्याची व्यवस्था नाही. तसेच घरात चार सदस्य आहेत. त्यांना करोनाची बाधा होऊ नये यामुळे झाडावर क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत कोणीही मदतीला आलं नाही. झाडावर राहत असताना कुटुंबीयांकडून एका बादलीला दोरी बांधून अन्न पुरविले जात होते, असं शिवाने सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.