पुणे, दि. 7 – शहरातील दांडिया उत्सवाची रशियातील मास्को शहरातील तरूणींना भुरळ पडली. यावेळी त्यांनीही दांडियाचा फेर धरला. या मुली गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहराच्या अभ्यासदौऱ्यासाठी आल्या आहेत. लक्ष्मी रोडवरील गरूड गणपती मंडळातील महिलांशी त्यांनी संवाद साधत दांडियाचा आनंद लुटला.
रशियातील मास्को शहरातील दोघी मैत्रिणी देशातील मेट्रो शहराच्या अभ्यासासाठी आल्या आहेत. येरवडा येथील नेटक्रॅकर टेक्नोलॉजिस टेक पार्कमधील कंपनीत त्या काम करतात. गणशोत्सवात त्या लक्ष्मी रोडवरील गरुड गणपती मंदिराजवळ गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापणेवेळी आल्या होत्या. त्यांनी विसर्जन मिरवणुकीतही सहभाग घेतला. तसेच, दसऱ्याच्यादिवशी गरूड गणपती मंदिरात दर्शन घेतले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंडळाने महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला कार्याला उजाळा देणारा केलेला देखावा पाहून त्या दोघीही भारावून गेल्या होत्या. महिला सदस्यांसह दांडिया खेळताना त्यांनी संस्कृती समजावून घेतली. यावेळी गरूड गणपती मंडळातील सुपर्णा कडू, उमा चिंचवडे, मेघना दौंडकर, रेणुका ढोले, माधुरी काटे, प्रणिता जाधव, नेहा सांगळे, केतकी सांगळे, कुंदा जोरी, निशीगंधा जोरी, वालिशा जाधव, पूजा कोंथमिरे, गायत्री कांबळे आदीसोबत रशियाच्या मुलींनी फेर धरला.