जळगाव: विधानपरिषद उमेदवरीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते. परंतु, मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिल्याचे खडसे म्हणाले.
खडसे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली.
आम्हाला विधानपरिषदेवर संधी दिली जाईल, असे राज्यसभेच्या वेळी सांगण्यात आले होते, मात्र, आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन दगाफटका झाला. याचे दुःख नसून ज्यांनी पक्ष्याला शिव्या दिल्या. पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला आहे.