अहमदनगर – नृत्यांगना गौतमी पाटीलची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात वाढली आहे. महाराष्ट्रात गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही जिल्ह्यात असला तरी कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. गर्दी झाली की हुल्लडबाजी सुरु होते आणि पब्लिक अनावर झालं की त्याचा परिणाम कार्यक्रमावर होतो. असाच प्रसंग नुकताच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. गौतमी कार्यक्रमासाठी वेळेत आली आणि कार्यक्रम सुरु देखील झाला. परंतु थोडयाच वेळात काही अतीउत्साही प्रेक्षकांनी गौतमीवर नोटांची उधळण केली. मात्र यानंतर कार्यक्रम पंधरा मिनिटे थांबवण्यात आला.
काल नगर येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान हा प्रकार घडला. गर्दीला नियंत्रणात आणल्यानंतर हा कार्यक्रम सुरु झाला. मात्र तरीही काही जण गोंधळ करत होते,हुल्लडबाजी वाढत होती. अखेर गर्दी अनावर झाल्याने गौतमीने कार्यक्रमातून काढता पाय घेतला. राहाता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर गोंधळ इतका वाढला होता कि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. प्रचंड गर्दी असल्यामुळे जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने जमाव सैरभैर होऊन पांगळा गेला. गौतमीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तिच्याभोवती सुरक्षा कडा बनवला आणि तिला कार्यक्रम स्थळापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर गौतमीच्या लावण्यांनी धुमाकूळ घातला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती परिचित झाली आहे. काही लावण्यांमध्ये तीने केलेल्या अश्लील हावभावावरून तीच्यावर जोरदार टीकाही झाली आहे. अनेकांनी तीला सुनावल्यानंतर तीने अनेकदा माफी मागून पुन्हा चुका होणार नसल्याचे म्हंटले मात्र तरीदेखील तिच्या कार्यक्रमांदरम्यान हुल्लडबाजी होतानाचे प्रकार समोर येत आहेत.