रायगड जिल्ह्यातून दोघे जेरबंद
लोणी काळभोर-पौड (ता. मुळशी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावाच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने दोघांना रायगडमधून जेरबंद केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
अशोक देवू हिलम (वय 31, रा. वाकी, आदिवासीवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) व गणेश रघुनाथ वाघमारे (वय 27, रा. वाकी; मूळ गाव मढाळी, आदिवासीवाडी, पुगाव, ता. रोहा) अशी आरोपींची नावे आहेत. हे खून खवले मांजराच्या तस्करीतून झाले आहेत. या घटनेत विजय आबा साळुंखे (वय 32, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व विकास विलास गोसावी (वय 28, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) या दोघांचा खून पिंपरी गावचे हद्दीत कुंडलिका व्हिला दरीजवळ 3 जुलै 2019 रोजी करण्यात आला होता. त्यांचे मृतदेह चार चाकी गाडीत टाकून गाडी पेटवून देऊन दरीतून खाली ढकलून देण्यात आली होती. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी ही हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.
पोलीस निरीक्षक घनवट यांनी सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, हवालदार मोरेश्वर इनामदार, मुकुंद अयाचित, सचिन गायकवाड, शब्बीर पठाण, राजु पुणेकर, विशाल साकुंके, नितीन भोर, गुरू जाधव, प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे, समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार केले. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून अशोक देवू हिलम व गणेश रघुनाथ वाघमारे यांना ताब्यात घेऊन तपास केला. या दोघांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार गणेश सुनिल पवार (रा. सुतारवाडी, ता. रोहा), शंकर हिलम (रा. सुतारवाडी वाकी) व लहान्या सोनु जाधव (रा. निजामपुर वाकी) यांच्या साथीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांकडे गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता यातील मुख्य आरोपी अशोक हिलम व खून झालेले दोघे हे खवले मांजराची तस्करी करण्याचे काम पूर्वी एकत्रित करीत होते. त्यांच्यात गैरसमज व व्यवहारातून दोघासंचा खून करण्यात आला. खिशातील रक्कम काढून घेतली व दोघांपैकी एक मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये व दुसरा मृतदेह पाठीमागील सिटवर ठेवून ताम्हीणी घाटातील कुंडलिका व्हॅली दरीतून गाडी ढकलून देण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडी थोड्या अंतरावर जावून थांबली व ढकलूनही दरीतून खाली जात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. गुन्ह्याचा पुढील तपास हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील या करीत आहेत.