पुणे – ‘विकास दांगट यांना भाजपची फुस आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा जनतेत आहे. त्यामुळे ते छुप्या पद्धतीने भाजपसोबत गेले आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल तयार करताना अनेकवेळा विकास दांगट यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु त्यांनी वेळकाढूपणा करत शेवटच्या टप्प्यापर्यंत गाफील ठेवत राष्ट्रवादीची फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होती. त्यावेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के, हवेली तालुका राष्ट्रवादीचे तीन्हीही अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, दिलीप वाल्हेकर आणि भरत झांबरे उपस्थित होते.
गारटकर म्हणाले, “दांगट यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली आहे. हवेली तालुक्यात बहुतांशी सोसायटी, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. भाजप म्हणून खुला प्रचार केला तर ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे भाजपने दांगट यांच्या माध्यमातून भाजप हवेली बाजार समितीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी दांगट यांना भविष्यात उमेदवारी देण्याचं गाजर दाखविण्यात आले आहे. अशी चर्चा सध्या जनेतेत आहे. भाजपाच्या बाजूने लढायचे होते तर खुलेआम लढणे गरजेचे होते.
दांगट यांच्याकडून मिळणारी वागणूक कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी होती. अण्णासाहेब मगर विकास आघाडी सर्वपक्षीय आहे असे नेतेमंडळी ओरडून सांगत होते. मात्र, हा पॅनेल सर्वपक्षीय नसून भाजपप्रणित छुपा पॅनेल असल्याचे आता मतदारांसमोर येत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे गारटकर यांनी सांगितले. मतदार खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत असलेल्या, पक्षप्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार चाललेल्या राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेललाच मतदान करतील. हे 29 एप्रिल रोजी निकालात दिसून येईल.’