मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने कोणत्याही व्याजदरात बदल केले नाहीत. गरज पडल्यास उपाययोजना करण्याची शक्यता बॅंकेच्या पतधोरणात खुली ठेवण्यात आली आहे.
मार्चपासून रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 1.15 टक्क्यांची कपात केली आहे. आता तो 4 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर उणे 23.9 टक्के झाला असला तरी चौथ्या तिमाहीत विकासदर सकारात्मक म्हणजे शून्य टक्क्यापेक्षा जास्त असेल, असे बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. पूर्ण वर्षाचा विकासदर उणे 9.5 टक्के राहील.
सध्या महागाईचा दर 6 टक्केपेक्षा जास्त असला तरी मार्च 2021 पर्यंत महागाईचा दर 4 टक्क्यांच्या जवळपास असेल. बॅंकेने भांडवलसुलभता वाढविण्यासाठी रोखे खरेदी-विक्री केली आहे. आगामी काळातही या प्रक्रियेचा वापर करून भांडवल सुलभता उपलब्ध करण्याचे रिझर्व्ह बॅंकेने ठरविले आहे.
पत धोरणातील ठळक बाबी :-
- रेपोदर 4 टक्के
- विकासदर उणे 9.5 टक्के
- शेवटच्या तिमाहीत विकासदर शून्य टक्केपेक्षा जास्त
- भांडवल सुलभतेसाठी आवश्यक उपाययोजना
- मार्चपर्यंत महागाई आटोक्यात
- रिटेल कर्जाच्या कमाल मर्यादेत वाढ