मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज ‘खोके दिन’ साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करत आहे. यावरून आता शिंदे गटातील नेत्यांनी आणि भाजप पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
नितेश राणे माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी असतो. त्यांच्याएवढा मोठा गद्दार कोणीही नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी खोटेपणा केला, मराठी माणसांशी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाशी खोटेपणाने वागले. असं म्हणत ते पुढे म्हणाले,’त्यामुळे २७ जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस’ घोषित करावा. मला आशा आहे की संयुक्त राष्ट्र संघटना माझ्या या मागणीचा नक्की विचार करतील’ असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान,शिवसेना पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांनी नवीन वाट निवडली त्याच घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने आज ‘खोके दिन’ आणि ‘गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.