-अमित डोंगरे
लॉकडाऊन पूर्वीचा आणि सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत असलेला महेंद्रसिंग धोनी यांच्यात प्रचंड फरक पडलेला दिसून येत आहे. एक काळ होता की, संघातील एखाद्या खेळाडूचे अपयश धोनी स्वतःच्या डोक्यावर घेत असे. आज तोच धोनी पराभवाचे खापर इतरांवर फोडताना दिसत आहे.
कॅप्टन कुल, बेस्ट फिनिशर, सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार, अशा अनेक बिरुदावलीने धोनी ओळखला जातो. मात्र, यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत जबाबदारी इतरांवर ढकलणारा धोनी दिसू लागला व चाहत्यांनाही त्याचा संताप आला. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला धोनी अपयशी ठरला. त्याला चेंडू कनेक्टच करता येत नव्हते. त्यातच तो त्रिफळाबाद झाला. मात्र, यात स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्याने स्वतःचे नाव न घेता आमचे काही फलंदाज जबाबदारीने खेळले नाहीत म्हणून पराभूत झाल्याचे त्याने पराभवानंतर बोलताना सांगितले.
वास्तविक चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांबद्दल धोनी बोलत आहे. त्यांनीच केलेल्या कामगिरीवरच त्यांच्या संघाला स्पर्धेत आगेकूच करण्याची आशा आहे. धोनीसह केदार जाधव तसेच सॅम कुरेन व रवींद्र जडेजा यांना सातत्याने अपयश येत असतानीही धोनीने आपले नाव न घेता इतरांवर पराभवाचे खापर फोडले आहे. धोनीचे हे वर्तन क्रिकेट विश्वाला नवे आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात धोनी जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा 13.1 षटकात 3 बाद 101 ही धावसंख्या होती. विजयासाठी 41 चेंडूत केवळ 67 धावांची गरज होती. मात्र, धोनीने एक चौकार फटकावून आपला इरादा स्पष्टही केला होता. मात्र, त्याच्या यंदाच्या फलंदाजीत पूर्वीचा फिनिशर टच दिसत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
तो कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीच्या ज्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला तसेच चेंडू त्याने आपल्या कारकिर्दीत मैदानाबाहेर फेकून दिले आहेत हेच तो देखील विसरला असावा. ऍक्रॉस द लाइन खेळून त्याने आत्मघात केला. संघाला जेव्हा त्याची गरज होती, त्या प्रत्येकवेळी त्याने असे सामने सहज जिंकून दिले आहेत. या सामन्यातच नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेतच धोनी संभ्रमात सापडल्यासारखा दिसत आहे.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नईचे नेतृत्व करताना जो पूर्वीचा तडफदार धोनी कुठेतरी हरवला आहे. विलगीकरण कालावधीने मानसिकतेत व कामगिरीत फरक पडला असे सांगणारा धोनी हा आपला धोनी नव्हेच. तो आला तो खेळला व तो जिंकला हे चित्र आता पुसट होऊ लागले असून धोनी युगाचा खऱ्या अर्थाने अस्त झाल्याचीच ही नांदी आहे. पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेणारा धोनी हा नाही हे देखील दिसून येत आहे.आमची फलंदाजी दर्जेदार झाली नाही, असे सांगणाऱ्या धोनीला आपण ओळखतो. मात्र, हा कोणीतरी वेगळाच धोनी आहे. स्प्लीट पर्सनॅलिटीबाबत ऐकले होते. मात्र, या स्पर्धेत धोनीला पाहिल्यावर ते खरे आहे हे देखील सिद्ध झाले.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला त्यानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्या सामन्यात धोनी धावबाद झाला व संघाला पराभव पाहावा लागला. त्यानंतर त्याने मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेद्वारे सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायचे ठरवले होते.
करोनामुळे ही स्पर्धाच नाही तर जागतिक क्रिकेटही ठप्प झाले व त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला. ही स्पर्धा अमिरातीत होणार हे स्पष्ट झाल्यावर त्याने चेन्नई संघाच्या सराव सत्रात सरावही सुरू केला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर पूर्वीचा धोनी दिसेल ही चाहत्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली. व्यक्ती-व्यक्तींमध्येही फरक असतो. काही कष्टाळू असतात, काही कसे-टाळू असतात. आता धोनीही त्याच वाटेवरून चालत असून कष्ट-टाळू बनू लागला आहे.