पिंपरी – परतीच्या मॉन्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.
शनिवारी (दि.10) पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत आहे. गेले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण ढगाळ असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उत्तर अंदमान आणि बंगालचा उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे रविवारपासून (दि. 11) कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात चढउतार सुरू झाले आहेत.