सिंहगडरस्ता –सिंहगड परिसरात नांदेड ते राजाराम पुलापर्यंत महिलांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. तर, एका स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होऊनही ते वापरण्यास उपलब्ध नसल्याने परिसरातील महिलांची कुचंबणा होत आहे. धायरी, अभिरुची, माणिक बाग, संतोष हॉल ते राजाराम पुलापर्यंत महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय नाही. माणिक बाग येथे एक स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले तरीही ते महिलांसाठी खुले करण्यात आलेले नाही.
संतोष हॉल येथे स्मार्ट सिटी अंतर्गत “ती बस’ची सोय आहे. मात्र, कित्येक दिवसांपासून “ती बस’ही बंद आहे. तसेच, राजाराम पुलाजवळ डाव्याबाजूला खासदार निधीतून “इ-टॉयलेट’ सुरू करण्यात आले होते. मात्र, तेही कित्येक वर्षांपासून बंदच आहे, त्या स्वच्छतागृहात घाणीचे आणि बाहेर पोस्टरचे साम्राज्य आहे, त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.
स्मार्ट सिटी तसेच मेट्रो सारख्या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या मात्र कमी आहे. पालिकेवर गेली पाच वर्षे सत्ता असलेल्यांनीही यासाठी प्रयत्न केले नाहीत. – श्रद्धा विक्रम मणेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला आघाडी
माणिक बाग येथील महिला स्वच्छतागृहोच काम पूर्ण होऊनही ते सुरू झालेले नाही, अशी माहिती मिळाल्यानंतर उद्याच्या उद्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन प्रशासनाकडूनच करा आणि ते खुले करा. उर्वरीत दोन स्वच्छतागृह लवकरच सुरू करू.
– संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय