…तर रमेश थोरात आमदार असते

दौंडमध्ये पदाधिकाऱ्यांनी काम न केल्याची अजित पवार यांच्या मनात भावना

केडगाव- दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांच्यामुळे नाही तर राष्ट्रवादी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमुळे झाला आहे. या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते तर आज रमेशआप्पा थोरात आमदार असते, अशी खंत पवार यांनी उघडपणे व्यक्त केली आहे.

दौंड तालुक्‍यातील जागा गेल्याची सल, माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार अजित पवार यांनी सोमेश्‍वर कारखान्याच्या सभेत बोलून दाखविल्याने हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कोण? याबाबत गटागटात चर्चा सुरू झाली आहे. दौंड मतदार संघात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा निसटत्या मतांनी झालेला पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. विधानसभे निवडणुका पार पडून महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी रमेश थोरात यांचा झालेला पराभव राष्ट्रवादी पक्ष विसरलेला नाही. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्‍यातील सोमेश्वर कारखान्यावर झालेल्या जाहीर सभेत मनातील ही सल बोलून दाखवली. विधानसभा प्रचार काळात राज्यभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांनी प्रचाराच्या झंझावाताने वातावरणात रंगत निर्माण केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतून राष्ट्रवादीकडे एकही पैलवान उरला नाही या केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर देत विजय खेचून आणला.

ग्रामीण भागात चांगले वातावरण असताना आणि शिरूर, इंदापूर, बारामती इत्यादी आसपास असणाऱ्या सर्वतालुक्‍यातील विधानसभेच्या जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. परंतु, दौंड तालुक्‍यात मात्र पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांना केवळ 750 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ही बाब पक्षाने विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. डबल ढोलकी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आगामी काळात पक्ष कानउघाडणी करणार का? त्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्याला संधी देणार? याकडे तालुक्‍यातील निष्ठावान कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

  • पदाधिकाऱ्यांच्या गावातच पिछेहाट…
    दौंड तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गावातच रमेश थोरात पीछाडीवर असल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्ष पक्षाची पदे उपभोगणारे पदाधिकारी ऐन निवडणूक काळात पक्षाच्या उमेदवारासाठी काम करताना मात्र निष्ठा दाखवत नाहीत, हे पक्षासाठी हिताचे नाही, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)