“भीमापाटस’वरून विरोधकांचे मनसुबे उधळणार

भाजपमध्ये आमदार राहुल कुल यांचे वजन आजही कायम

दौंड- दौंड तालुक्‍याकरिता आर्थिक उलाढालीची वाहिनी ठरलेल्या भीमा पाटस कारखान्याबाबत गेल्या काही वर्षात मोठे राजजकारण करण्यात आले होते. कारखाना बंद असल्याचे कोणालाच दु:ख नव्हते.., विरोधकांनी केवळ राजकारणाचा मुद्दा म्हणून भीमा पाटस कारखान्याचा विषय उचलून धरला होता, अशा स्थितीत आमदार राहुल कुल यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत निधी मिळवून भीमा पाटस कारखाना सुरू केला. आता, राज्यात सत्तेचे वारे फिरत असताना साखर कारखान्यावरूनच कुल यांना घेरण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु, आमदार कुल यांनी भाजपच्या राज्यस्तरीय नव्हे तर केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशीही मोठा संपर्क ठेवल्याने विरोधकांचे मनसुबे उधळून लावले जात आहेत.

दौंड विधानसभा निवडणुकीत तालुक्‍यात सत्ता कोणाची येणार, यावर बरेच काही अवलंबून होते. याच निवडणुकीत कुल यांनी निसटती बाजी मारली. कुल यांनी सत्ता कायम ठेवली असली तरी आगामी काळात भीमपाटस साखर कारखाना, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सोसायट्यांच्या निवडणुकांत आमदार कुल यांना वर्चस्व कायम ठेवावे लागणार आहे.

दौंड तालुक्‍याचे राजकरण हे भीमा पाटस कारखान्यावर अवलंबून असते हे मागील पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालावरुनही स्पष्ट झाले आहे. कारखाना बंद होता त्याचा फटका अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांना त्यावेळी निवडणुकीत बसला होता. परंतु, राजकीय अपयशाचे खापर केवळ मतदार किंवा शेतकरी सभासदांवर फोडत बसण्यापेक्षा कारखाना सुरू करण्यावर कुल यांनी भर दिला. भीमा पाटस कारखाना आर्थिक अडचणीत असताना सुद्धा 2601 रुपये दर देण्याचे जाहीर करून जिल्ह्याची उसदराची कोंडी आमदार कुल यांनी फोडली होती. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनीही कुल यांना उचलून धरले.

दौंड तालुक्‍यात एकमेव सहकारी साखर असलेला भीमा पाटस कारखाना सुरू झाल्याने तालुक्‍यातील इतर असणाऱ्या खासगी कारखान्यांच्या मनमानीपणाला आमदार कुल यांच्या वक्तव्यामुळे चाप बसला आहे. भीमा पाटस हा एकमेव सहकारी साखर कारखाना असल्याने सहाजिकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या कारखान्याला सहानभूतीच आहे, याच कारणातून कारखान्याशी संबंधीत स्त्रोत विधानसभेत कुल यांच्या बाजुनेच उभे राहिले.

भीमा पाटस कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्याची आव्हान आता आमदार राहुल कुल यांच्यापुढे असणार आहे. याच कारखान्याकरीता कुल यांनी गेल्यावेळी मंत्रीपदावरही पाणी सोडले होते. ही बाब खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही पोहचलेली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत कुल यांनी भाजपकडून निवडणूक लढविल्याने पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांतही कुल यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे.

भीमा पाटस कारखान्याबाबत आमदार राहुल कुल नेहमीच विरोधकांच्या टिकेचे धनी ठरले आहेत. परंतु, 2014 पासून स्वतंत्रपणे वाटचाल करणारे कुल यांनी तालुक्‍यातही स्वअस्तित्त्व निर्माण केले आहे. एकंदरितच भीमा पाटस कारखाना यंदाही अगदी सक्षमपणे गळित करणार असून साखर उत्पादनही उच्चांकी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)