पुणे : लॉकडाऊनमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडे तपास करून हडपसर, मुंढवा भागातील घरफोडी आणि वाहनचोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच गुन्ह्यातील सोन्याचे दागिने आणि 2 दुचाक्या असा 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सन्निसिंग पापासिंग दुधानी (19 रा. गल्ली नंबर 5, बिराजदार नगर हडपसर) आणि अक्षय संतोष सोनी (28 रा. नवीन म्हाडा कॉलनी सुरक्षानगर हडपसर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरात चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक गुन्ह्याचा तपास करीत होते. यावेळी घरफोड्या करणारे सराईत दोघे फुरसुंगी भागात फिरत आहेत अशी माहिती पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे तपास पथकाचे सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरिक्षक हिमालय जोशी, कर्मचारी युसूफ पठाण, रमेश साबळे, नितीन मुंढे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, अकबर शेख, शाहीद शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे,प्रविण उत्तेकर यांच्या पथकाने सनिसिंग आणि अक्षय सोनी यांना पकडले.
अटक केलेल्या दोघा आरोपींनी त्यांचे बिरजूसिंग दुधानी आणि एक अल्पवयीन साथीदार असे चौघांनी मिळून हडपसर, मांजरी, गोंधले नगर, सातववाडी, ससानेनगर, बीटी कवडे रोड, घोरपडीगाव याभागात घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून हडपसर 7 , मुंढवा 3, आणि पिंपरी चिंचवड 1 असे 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सनीसिंग हा सराईत गुन्हेगार असून पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे जिल्हा आदी ठिकाणी 20 गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे तर बिरजूसिंग हा पुणे शहर, ग्रामिण आणि धुळे जिल्ह्यातील 25 गुन्ह्यात पाहिजे असलेला गुन्हेगार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन आरोपीना पकडले- कल्याणराव विधाते
आरोपी विरोधात पुण्यासह इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागात फिरून जोखीम घेत हडपसर पोलिसांनी आरोपीना पकडले आणि गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळे रिवार्ड साठी आयुक्तांकडे शिफारस करणार असल्याचे सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांनी सांगितले.