लंडन – दारु अमली पदार्थ आणि इतर अनेक नशिल्या पदार्थांवर आता मोठ्या प्रमाणावर नियंत्रण असल्याने तरुण पिढी नशेचा आनंद मिळवण्यासाठी इतर मार्गांकडे वळली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता डिजिटल ड्रग्सचा वापर केला जात आहे. हा एक प्रकारचा ऑनलाइन प्रकार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी तरुण पिढिचा या डिजिटल ड्रगचा वापर करण्याकडे कल वाढला आहे.
जगातील संशोधक या डिजिटल ड्रग्जचे संशोधन करत आहेत. या डिजिटल ड्रगचे वैज्ञानिक नाव बायनॉरल बिट्स असे आहे. हा एक संगीताचा प्रकार असून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि संगीत विषयक साइटवर हा उपलब्ध आहे. मोबाइल फोनचा वापर करून या संगीताचा आनंद घेता येतो आणि हे संगीत ऐकताच तरुण पिढीला नशेचा अनुभव येतो. बायनॉरल याचा अर्थ दोन कान असा आहे. या संगीत प्रकारांमध्ये संगीत ऐकणाऱ्याला दोन्ही कानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकू येते. त्यामुळे मेंदूचा गोंधळ उडतो आणि या दोन्ही आवाजांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो.
ही प्रयत्नाची प्रक्रिया सुरू असतानाच मेंदूमध्ये एक तिसरा आवाज तयार होतो आणि तिसरा आवाजच ऐकणाऱ्याला नशेचा अनुभव देतो. ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यू जर्नल नावाच्या एका मासिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले असून तरुण पिढी या डिजिटल ड्रगकडे मोठ्या प्रमाणात का वळली आहे याबाबत तेथे काही निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. या संदर्भात 30 हजार लोकांवर संशोधन करण्यात आल्यानंतर 7 टक्के लोकांनी अशा प्रकारचे संगीत पसंत केल्याचे लक्षात आले.
अशा प्रकारचे संगीत ऐकताच आता झोप लागते अशा प्रकारची उत्तरे काही लोकांनी या संशोधनात दिली. मूड बदलण्यासाठी काही लोकांनी या संगीताचा वापर केला असेही समोर आले. संगीत ऐकतानाच आपल्याला आपल्या आवडीचे स्वप्न पाहता येते असेही काही लोकांनी या संशोधनात स्पष्ट केले आहे जगातील अमेरिका मेक्सिको ब्राझिल रोमानिया या देशांमध्ये सध्या या डिजिटल ड्रगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.