सोलापूर – शरद पवार यांच्यावर केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांचे समर्थन केल्याने राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात आली.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सदाभाऊ खोत काही कार्यक्रमानिमित्त आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश युवक उपअध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंगसहित शासकीय विश्रामगृहात घुसले आणि सदाभाऊ खोत ज्या रूममध्ये बसले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी निदर्शने केली.
यामुळे एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच योग्य कार्यवाही करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचासमोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.