हक्‍काच्या थकीत वेतनासाठी कामगाराचा वर्षभरापासून लढा

  • कामगार उपआयुक्‍तालयासमोर आंदोलन सुरू
  • प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर

पुणे – हॉटेलमध्ये ग्राहकांना हवं-नको ते आदबीने विचारणारा एक “कॅप्टन’ सध्या उपासमारीचे आयुष्य जगत आहे. चेन्नईहून दिल्ली आणि पुण्यात नोकरी करणारा “वीर’ आपल्या हक्‍काच्या पगारासाठी कामगार उपआयुक्‍त कार्यालयाकडे दाद मागतोय. पगार, इन्सेंटिव्हसह अन्य भत्ते मिळावे म्हणून वर्षभरापासून बाणेर (पुणे) एका रेस्टॉरंट व्यवस्थापनाशी सुरू असलेले तडजोडसत्र थांबत नाही; शासकीय यंत्रणा हाताशी असल्याने कामगाराच्या “या’ लढ्यातून काहीही साध्य झालेले नाही, त्यामुळे या “कॅप्टन’ने अखेर कामगार उपआयुक्‍त कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे.

मूळचा चेन्नईचा असलेले वीराराघवन व्यंकटसुब्बू यांचे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्टेशन (बीबीए) शिक्षण घेतले आहे. याशिवाय हॉटेल ऑफ केटरिंग मॅनेटमेंटचा (एचसीएम) अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीनिमित्त वीरा राघवन हे नोयडा (दिल्ली) येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. दिल्लीला रामराम केल्यानंतर त्यांनी पुण्यात आले. पुण्यातील बाणेर परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये फेब्रुवारी 2019 पासून नोकरी सुरू केली.

हॉटेल व्यवस्थापनाने पगार आणि इन्सेंटिव्ह असे ठरले खरे, पण पहिले तीन महिने पगार दरमहा मिळाला; मात्र इन्सेंटिव्हसाठी तीन महिन्यांची वाट पहा, असे सांगण्यात आले. मात्र तीन महिन्यानंतर पगाराशिवाय अन्य भत्ता देण्यास व्यवस्थापनाने स्पष्ट नकार दिला. तसेच सर्व्हिस चार्ज देऊन असे म्हणून हॉटेल व्यवस्थापनाने चालढकलपणा केला. त्यानंतर पुढील काही महिन्यांत सर्व्हिस चार्जलाही वाटाण्याच्या अक्षदा वाहण्यात आल्या.

कामगारांना सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ हॉटेलमधील सर्व कामगारांनी 17 ऑगस्ट 2019 रोजी आंदोलन केले. या प्रकारानंतर व्यवस्थापनाने काही कामगारांना घरी पाठविले. मात्र वीराराघवन यांनी पगार दिल्याशिवाय हॉटेलची रूम सोडलीच नाही.

वीराराघवन यांना खोलीत डांबण्यात आले, त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर अखेर एका कामगाराकरवी व्यवस्थापाने मला खोलीतून बाहेर काढले. पगार देण्याचे मान्य केले, मात्र इन्सेंटिव्ह, सर्व्हिस चार्ज देणार नाही या भूमिकेवर व्यवस्थापन ठाम राहिले. त्यादरम्यान, मारहाण आणि माझी बॅग हिसकावून घेत खोलीतून बाहेर काढले. त्यानंतर माझा मोबाईलही हिसकावत मन:स्ताप दिला.

यासंदर्भात हॉटेल व्यवस्थापनाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास टकले आणि सरचिटणीस मोहन शेलार यांनी वीराराघवन यांना आधार दिला. आणि संघटनेच्या माध्यमातून कामगार उपआयुक्‍त कार्यालयाकडे दाद मागितली. वर्ष लोटले मात्र व्यवस्थापन आणि कामगार यांच्या समेट घडविण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरली आहे. अर्थातच हॉटेल व्यवस्थापनाच्या हाताशी शासकीय यंत्रणा असल्याने मला न्याय मिळत नाही, असा आरोप कामगार वीराराघवन यांनी केला आहे.
यासंदर्भात कामगार उपआयुक्‍त विकास पनवेलकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

दरम्यान, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची रविवारी (दि. २४) मंचर येथे भेट घेत वीराराघवन यांच्या थकीत वेतन, आंदोलन आणि लढ्याची माहिती दिली. त्यामुळे आता वीराराघवन यांच्या आंदोलन आणि लढा कामगारमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.

हॉटेल व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात तडजोड करण्याचा कामगार उपआयुक्‍त कार्यालयाचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल व्यवस्थापन वारंवार सांगत आहे की आम्ही कामगाराला पगार दिलेला आहे. कामगार उपआयुक्‍तालयाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यासंदर्भात खटला दाखल होऊन सहा-सात वेळा सुनावणी देखील झाली आहे. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात तडजोड झाली नाही, तर आम्ही हे प्रकारण न्यायालयाकडे सोपविण्यात येईल.
– श्रीकांत चोभे, सरकारी कामगार अधिकारी (पुणे)


महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा वीराराघवन हे सदस्य असून, संघटना त्यांच्या पाठिशी आहे. 14 जानेवारीपासून कामगार उपआयुक्‍त कार्यालयासमोर वीराराघवन यांनी पगार, इन्सेंटिव्ह आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. हॉटेल व्यवस्थापनाने वीराराघवन यांना मारहाण आणि पिशवी, पाकिट हिसकावून घेत हाकलून दिले आहे. यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरी कामगार उपायुक्‍त कार्यालयाने कामगाराच्या मागण्यांना न्याय द्यावा.
– विलास टकले, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.