सॅनिटरी नॅपकिनचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम !

पियुषा अवचर

पुणे : मासिक पाळी दरम्यान वापरल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम म्हणजे पॅड केअर लॅब आणि पॅड केअर बिन्स. 

मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याकडे सध्या महिलांचा कल जास्त आहे.  परंतु या वापरलेल्या पॅडचं योग्य प्रकारे विघटन केले जात नाही. याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याने यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक तरुण-तरुणी आपापल्या पद्धतीने संशोधन करत आहेत. अशाच प्रयत्नातून पुण्यातील तरुणांनी जुलै २०१८ मध्ये ‘पॅड केअर बिन’ या स्टार्टअपची सुरुवात केली.

;

‘पॅड केअर बिन’ प्रत्येक टॉयलेटमध्ये बसवल्यानतंर वापरलेले पॅड्स या ‘पॅड के अर बिन’मध्ये टाकले जातात. या बिनला स्पर्श न करता महिला त्यामध्ये वापरलेला पॅड सहज टाकू शकते हे बिन ९९.९९ % विषाणूविरहित आहेत.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग झालेल्या अजिंक्य धारिया आणि त्याच्या टीमने हे पॅड के अर बिन्स आणि लॅब विकसित केली आहे. ‘२०१७ साली अजिंक्यच मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. २०१८ मध्ये या विषयावर काम करण्यासाठी त्याला ‘सोच’ नावाची फेलोशिप मिळाली. प्रोजेक्टच्या सुरुवातीला त्याच्या टीमने मिळून १ हजार ५०० महिलांचा सर्व्हे केला. या अभ्यासातून खऱ्या अर्थाने ‘पॅड केअर लॅब’ या स्टार्टअपला सुरवात झाली. अजिंक्यसोबत आसावरी काने, श्रीनिवास अधे, जेना शहा,आकाश पाटील, अनया शेठ, अवनी डार्णे,अंजली वैद्य अशी तरुण टीम काम करत आहे.

सफाई कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

अनेकदा स्वच्छतागृहांमध्ये महिला वापरलेले पॅड्स कचराकुंडीत टाकताना ते कोणत्याही कागदात किंवा पिशवीत भरून न टाकता तसेच टाकून देतात. सार्वजनिक ठिकाणी तर याची परिस्थिती याहूनही वाईट असते. त्यामुळे नाईलाजाने सफाई कामगारांना त्यांच्या हाताने ते पॅड्स उचलावे लागतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा गंभीर दुष्परिणाम होतो. अनेक त्वचेचे आजार असा कचरा उचलल्याने सफाई कामगारांना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

‘पॅड केअर बिन’ प्रत्येक टॉयलेटमध्ये बसवल्यानतंर वापरलेले पॅड्स या ‘पॅड के अर बिन’मध्ये टाकले जातात. हे बिन दर १५ दिवसांनी खाली करून ते लॅबमध्ये आणले जातात. त्यावर मशीनमध्ये प्रोसेस केली जाते. ही प्रोसेसे संपूर्णपणे धूरविरहीत असते. पॅडच्या विघटनानंतर त्यातून पुन्हा वापरता येईल असं सेल्युलोज आणि प्लास्टिक तयार होते. याच प्लास्टिकचा वापर पुढे कुंडी, पेवर ब्लॉक्स अशा अनेक गोष्टी बनवण्यासाठी केला जातो.

‘पॅड केअर लॅब’ ही जगातील पहिली धूरविरहीत पॅडचं विघटन करणारी आणि रिसायकल करणारी सिस्टिम ठरली आहे. याचे पेटंट ही त्यांनी मिळविले असुन स्वच्छतेचा दर्जा उंचावून महिलांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल राखुन ही तरुण पिढी काम करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.