मुंबई -होळीनंतर वायदा बाजार आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढायला सुरुवात होतील. सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 44000 च्या आसपास आहे. मात्र, आगामी दोन महिन्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा 48 हजारांची पातळी गाठतील, असा अंदाज सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.
अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात किंचित का होईना पण सातत्याने घसरण दिसून आली होती. गेल्या महिनाभराच्या काळात सोने प्रतितोळा जवळपास 1800 रुपयांनी स्वस्त झाले होते. हा ट्रेंड आणखी काही दिवस कायम राहील. मात्र, त्यानंतर सोन्याच्या किंमतीचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरू होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोने खरेदीसाठी होळीचा मुहूर्त साधावा, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, शनिवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,000 रुपये इतकी नोंदवण्यात आली. शनिवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 160 रुपयांची घसरण दिसून आली. या घसरणीनंतर सोन्याचे दर (22 कॅरेटचे 10 ग्रॅम) 43,920 रुपयांवरुन 43,760 रुपयांवर गेले. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,920 रुपयांवरुन 44,760 रुपयांवर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 10,000 रुपयांनी घट झाली आहे.