Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते आज 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांचा भव्य रोड शो पार पडला. युवा महोत्सवादम्यान नाशिकच्या पवित्र भूमीतून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना महत्त्वाचा आणि मोठा सल्ला दिला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. मोदी म्हणाले की, आजचा दिवस युवाशक्तीचा दिवस आहे. गुलामीच्या कालखंडात भारताला नव्या ऊर्जेने भारलं होतं. त्या महापुरुषाचा आजचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलो आहोत.
आजच जिजाऊंचीही जयंती आहे. जिजाऊ या नारीशक्तीचं प्रतिक होत्या. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनीनिमित्त मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत यायची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असं त्यांनी मराठीत भाषण करत म्हटलं.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, करोनाकाळात जगाने भारताची ताकद बघितली. सर्व भारतीयांना वॅक्सीन देऊन त्यांना डिजीटल सर्टिफिकेट दिले. भारतात आज इतका स्वस्त मोबाईल डेटा उपलब्ध आहे, जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देशाचा मिजास युवा आहे
आणि देशाचा अंदाजही युवा आहे. जो युवा असतो तो मागे हटत नाही, आघाडीवर असतो. आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत आघाडीवर नेतृत्व करत आहे. चांद्रयान, मेड इन इंडिया आएनएस विक्रांत अशा योजनांमुळे भारताचा उर अभिमानाने भरुन येतो. असं देखील मोदी आपल्या भाषणात म्हणाले.