मुंबई : प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करण्याची योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे 71 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा निवासस्थानी जलजीवन मिशन आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.
पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावीत. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून मिशन अंतर्गतची कामे वेगाने पूर्ण होतील. जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळजोडणी, पाणी गुणवत्ता, संस्थात्मक नळजोडणी व हर घर जल गावे घोषित करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिमही राबवण्यात आली आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,
जल जीवन मिशन हा केंद्र शासनप्रणीत 50:50 टक्के सहभागावर आधारित कार्यक्रम आहे. जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. राज्यातही जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे.