पळसदेव (वार्ताहर) – लोणी देवकर ते चांडगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आताच काही दिवसापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप रस्त्याच्या अनेक ठिकाणी साइडपट्ट्या भरण्याचे काम बाकी आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर काही ठिकाणचे डांबर पूर्णपणे उखडलेले आहे.
काही ठिकाणी रस्ता संपूर्ण उखडून रस्त्याला अगदी अर्धा फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आल्याचं सिद्ध होत आहे. तरी या कामाची तातडीने चौकशी करून ठेकेदारावर कारवाही व्हावी, अशी मागणी कर्मयोगी सहकारी कारखान्याचे माजी संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी केली आहे.
भावडी-चांडगाव रस्त्याच्या कामाच्या डांबरीकरणासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार काम करण्यात आले; मात्र ठेकेदाराने काम करताना दर्जा राखला नाही. त्यामुळे आमदार भरणे यांचे प्रयत्न पाण्यात गेले आहे.
ठेकेदार आपल्या स्वार्थासाठी अधिकार्यांना हाताशी धरून आर्थिक तडजोडीतून कामे उरकून बील काढून मोकळा झाला आहे. यामध्ये जनतेच्या कोट्यवधी रुपयाचा चुराडा झाला आहे. आलेला निधी जनतेच्या हितासाठी वापरण्या ऐवजी ठेकेदाराच्या खिशात जात आहे. आमदार भरणे यांच्याकडे या रस्त्याच्या कामाबाबत अनेक वेळा येथिल कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र परिस्थिती जशीच्या तशीच आहे.
लोणी देवकर ते चांडगाव या रस्त्याने अनेक शेतकरी ऊस, केळी खते, बियाणे सह अन्य शेतमालाची वाहतूक करतात, दूध वाहतूक, विद्यार्थी तसेच या भागातील नागरिकांना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जायला तसेच विद्यार्थी यांना शिक्षणासाठी जा ये करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
शिवाय या भागात राहणारे अनेक नागरिक बोटीने चांडगाव वरून करमाळा, कर्जत कडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी भावडी, चांडगाव, आगोती भागातील नागरिक करत आहेत.
लोणी देवकर ते चांडगाव रस्ता तयार झाल्यावर त्याचे लोकार्पण होण्याअगोदरच रस्ता खराब झाला. म्हणजे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत काय बोलावे. अधिकारी, ठेकेदार लोकप्रतिनिधी यांनी कमिशन खाऊन रस्त्यासाठी आलेले कोट्यवधी रुपये मातीत घातले आहेत.
मागे 15 वर्षांपूर्वी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या काळात हा रस्ता झाला होता. आता सध्याच्या लोकप्रतिनिधी आता रस्ता केला आणि तो उद्घाटनाच्या अगोदरच उखडून गेला आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तातडीने चौकशी करून साइड पट्ट्या भरून घेऊन उखडलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. -प्रशांत सूर्यवंशी, माजी संचालक कर्मयोगी सहकारी कारखाना