भवानीनगर, (वार्ताहर) –शासकीय काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे; परंतु हिंगणेवाडी (सणसर, ता. इंदापूर) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदाराने फक्त एक ते दोन फूट खोल चारी खोदून पाइपलाइन केली असून ही जलजीवन योजना केवळ मलिदा खाण्यासाठी राबवली जात आहे का, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.
हिंगणेवाडी परिसरातून उद्धट प्राधिकरण संजीवनी योजनेचे काम चालू असताना हिंगणेवाडी येथील जलजीवन योजनेची पाइपलाइन फुटली होती. पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी जुनी पाइपलाइन खोदून बाहेर काढण्यात आली. त्यावेळी पाइपलाइनची खोली एक ते दोन फुटापर्यंत असल्याचे दिसून आले आहे.
वास्तविक पाहता जलजीवन योजनेच्या पाइपलाइनची खोली ही एस्टिमेटमध्ये तीन फुटांच्या पुढे आहे; परंतु या ठिकाणी जलजीवन योजनेच्या पाइपलाइनचे झालेले काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जा हीन झाले असून केवळ एक ते दोन फूट खोलीवरच पाईपलाईन गाडण्यात आलेली आहे. हिंगणेवाडी ते घोलपवाडी या रस्त्याच्या बाजूने या जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे.
अगदी रस्त्यालगत पाइपलाइन असल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना किंवा साइडपट्टीचे काम करताना या पाइपलाइनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. पाइपलाइनची खोली कमी असल्यामुळे व रस्त्याच्या जवळून पाइपलाइन गेल्याने रस्त्यावरून अवजड वाहने जाताना देखील पाइपलाइन फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार आहे. संबंधित ठेकेदाराने हिंगणेवाडी जलजीवन मिशन योजनेच्या पाइपलाइनची खोली एस्टिमेटप्रमाणे करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हिंगणेवाडी जलजीवन योजनेच्या वाहिनीचे एस्टिमेटप्रमाणे काम झालेले नसून काम केवळ मलिदा खाण्यासाठीच केलेले आहे. ही योजना पूर्णपणे चुकीची आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून चुकीच्या पद्धतीने काम चालल्याने निधी पूर्णपणे वाया जाणार आहे. या योजनेच्या कामाकडे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी मात्र दुर्लक्ष केलेले आहे. ठेकेदाराने पाइपलाइनचे केलेले काम हे एस्टिमेटप्रमाणे करून द्यावे अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल. -श्रीनिवास कदम, संतोष चव्हाण, माजी उपसरपंच सणसर (ता. इंदापूर)