संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील पठार भाग व पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याची पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. जांबूत ते शिंदोडीपर्यंतचे केटीवेअर कोरडे ठाक पडल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
त्यासाठी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे, या मागणीसाठी जांबुतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी १ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणाला चार दिवस उलटून गेल्याने उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी तातडीने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांची साकूर येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली होती.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शासनाने या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाहीतर दि. ७ मार्च रोजी एकोणीस मैलावरील नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णयच या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच पेटणार आहे.
या बैठकीसाठी एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, संतोष वाडेकर, भाऊसाहेब डोलनर, दादा पटेल, सुदाम सागर, मिरा शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांना १५ ते २० गावांनी एकमुखी पाठिंबा दिला.
तसेच उपोषणस्थळी प्रत्येक गावाने दररोज जाऊन पाठिंबा देण्याचे ठरले. यावेळी कृती समितीची देखील स्थापना करण्यात आली. हक्काच्या पाण्यासाठी थेट हायकोर्टात जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, २०१६ व २०१९ साली पिंपळगाव खांड धरणाचे पाणी शिंदोडीपर्यंत मिळण्यासाठी संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. गेल्या ८ वर्षांपासून पाण्यासाठी लढाई सुरूआहे. त्यामुळे पुन्हा याच विषयावर शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
या बैठकीसाठी संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवाडी, मांडवे बु, शिंदोडी, कौठेमलकापूर, शेळकेवाडी, दरेवाडी, रणखांब, खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, जांबूत खु, जांबूत बु. हिवरगाव पठार, शेंडेवाडी, तास्करवाडी, चिंचेवाडी, हिरेवाडी, तसेच पारनेर तालुक्यातील मांडवे खु, देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी, पोखरी, खडकवाडी आदी गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.