वैष्णवी कदम
नगर, दि. 10 -महापालिका इमारतीच्या आवारात सर्रास तंबाखू, मावा, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार सुरू आहेत. या थुंकण्याने महापालिकेच्या भिंती लाल झाल्या आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर थुंकणार्यांवर महापालिकाच दंडात्मक कारवाई करते. त्याच महापालिकेतील भिंती मावा गुटख्यामुळे रंगल्या आहेत. त्याबाबत कोण आता महापालिकेवर कारवाई करणार असा प्रश्न पडतो.
महापालिका इमारतीमधील खिडक्या व परिसर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे अस्वच्छ झाल्याचे चित्र आहे. काही पालिकेतील कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर महापालिकेच्या खिडक्यांमधूनच बाहेर पिचकारी मारतात. पिचकारी मारताना खिडकीपशी ठेवलेले कामकाजाचे कागद पत्र देखील पिचकार्यांनी लाल झाले. मुळात शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. स्वच्छतेकडे किती गांभीर्याने पाहतात हे लक्षात येते.
महापालिकेत लावलेल्या सूचना फक्त नावालाच
’येथे थुंकू नये’, ’स्वच्छता राखा’, अशा सूचना महापालिका इमारतीत ठिकठिकाणी लावल्या आहेत. या सूचना ज्या ठिकाणी लावण्यात आल्या आहे. त्याच ठिकाणी नागरिकांनी जास्त घाण केली आहे. महापालिका इमारतीत प्रवेश केल्यानंतर समोरच मोकळी जागा आहे. येथे चारही कोपर्यांमध्ये सूचना लिहिण्यात आल्या आहेत. परंतु येथील चारही कोपरे थुंकल्यामुळे लाल झाले आहेत.
महापालिकेत कारवाई अपेक्षित
महापालिकेत प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी, तर राजकीय पदाधिकारी, नगरसेवक व कामानिमित्त येणारे नागरिक यांची नेहमी गर्दी असते. यापैकी बहुतांश जण तंबाखू, मावा, गुटखा, पान खाऊन थुंकण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. यावर प्रशासनाने खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे. तंबाखू व गुटखा मावा अशा पदार्थांना बंदी असताना असे पदार्थ महापालिकेत आणण्यास कोणीही बंदी करीत नसल्याने तंबाखुबंदीची वाट महापालिकेतच लागली आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाईची भूमिका घेण्याची गरज आहे. महापालिकेत थुंकणार्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.