राजगुरूनगर – लग्नाचे अमिश दाखवत युवतीची फसवणूक करीत तिच्यावर अनेकदा बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला खेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी 7 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बाळासाहेब लक्ष्मण बांगर (वय 40 रा. वंजारी चिंचपूर, जिल्हा बीड) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी, सांगली येथे डी एडच्या कोर्ससाठी असताना पीडिता व आरोपी बाळासाहेब बांगर यांची ओळख झाली होती. त्या ओळखीतून त्यांचे प्रेमात रुपांतर झाले होते. 2006 ते 2012 या कालावधीत आरोपी बाळासाहेब बांगर यांनी विविध ठिकाणी पीडितेस लॉजवर नेवून लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यानच्या काळात आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर पीडित युवती आणि आरोपी यांच्यात वाद झाले. त्यानंतर आरोपीने पीडित युवतींकडून 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्यांच्यातील अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ऑक्टोबर 2012 मध्ये सांगलीवरून पीडित युवतीला राजगुरुनगर येथे आरोपीने बोलावून घेतले. ती येथे आल्यावर तिच्याशी भांडण करून तिला मारहाण केली. पाच लाख रुपये देण्याची मागणी केली.
प्रियकराच्या पैशाच्या मागणीला आणि फसवणुकीला कंटाळून अखेर तिने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. मात्र तो जामिनावर बाहेर आला होता. हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायालयात न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या पुढे सुरु होता. त्याचा निकाल गुरुवारी (दि. 10) त्यांनी दिला. न्यायालयीन पोलीस कामकाज व्ही. पी. चौधरी यांनी केले.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी 7 साक्षीदार तपासले. पीडित महिला, मेडिकल ऑफिसर, विविध लॉजचे मॅनेजर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. महिलांच्या विरोधातील हा गुन्हा असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केला. आरोपीविरोधात साक्षीदारांची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरविण्यात आले.