नवी दिल्ली: भविष्यात भारतातील व्यवसाय वाढविण्याची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने अमेरिकन टेक कंपनी अॅपल इनकार्पोरेट ही लवकरच भारतात आपले रिटेल स्टोअर उघडणार आहे. येत्या वर्ष 2021 पर्यंत भारतात अॅपल पहिले रिटेल स्टोअर सुरु करणार आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी म्हटले आहे. कुक हे कॅलिफोर्नियामधील ऍपलच्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीच्या वेळी भारतामधील कंपनीच्या विस्तार व नवीन योजनांची माहिती देताना बोलत होते.
सदर बैठकीतकुक म्हणाले की ऍपलचे “ऑनलाईन स्टोअर’ भारतात चालू वर्षात (2020) सुरु होणार आहे. तर अॅपलचे भारतामधील ब्रॅंडेड स्टोर मात्र येत्या 2021 रोजी चालू करण्यात येणार आहे. सध्या भारतामधील स्टोअरसाठीच्या सरकारी निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आम्ही कोणत्याही भागीदारी शिवाय हे काम करणार असल्याचे कुक यांनी स्पष्ट करताना आम्हाला अॅपलचे स्टोअर दुसरे कोणी चालवणे योग्य दिसणार नसल्याचेही म्हटले आहे.
मागील वर्षात अॅपलकडून भारतामधील व्यवसायांच्या विस्तारांची आणि योजनांची माहिती दिली आहे. ही माहिती देताना कंपनीने सांगितले आहे, की आगामी दोन ते 3 वर्षात भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर हे आर्थिक राजधानी मुंबईतच उघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतरच दुसरे स्टोअर हे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येणार आहे.