नागठाणे – नागठाणे, सोनापूर, जांभळेवाडी (ता. सातारा) हद्दीतील नागरिकांनी त्याचबरोबर नागठाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी आर्थिक मदत व श्रमदानातून नागठाणे सोनापूर रस्त्याचे बाजूला जांभळेवाडी गावाच्या शेजारी श्री शंभू महादेवाचे स्वयंभू अवतार असलेल्या श्री रवळेश्वर देवाचे मंदिर बुधवारी एका रात्रीत बांधून पूर्ण केले.
नागठाणे सोनापूर गावच्या वेशीवर पांडवकालीन श्री शंभू महादेवाची पुरातन मूर्ती होती. नागठाणे गाव वसण्यापुर्वीपासुन ही रवळेश्वराची मुर्ती त्या ठिकाणी होती असे जेष्ठ नागरिक सांगतात. त्यानंतर नागठाणे गावावर कुठलेही संकट या रवळेश्वराने येऊ दिले नाही. त्यामुळे नागठाणे सोनापूर सह पंचक्रोशीतील नागरिकांची या रवळेश्वरावर अपार श्रद्धा आहे.
सध्या ज्या ठिकाणी ही मुर्ती होती ती भंगलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे आता येथे जीर्णोद्धार करणे गरजेचे होते. म्हणून पांडवकालीन मूर्तीचे विधीवत विसर्जन करून त्याठिकाणी नवीन मुर्ती प्रतिष्ठापना करण्याचा व नवीन मंदिर व मंडप एका रात्रीत उभारण्याचा निर्धार नागठाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी केला होता. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव, कारागीर , लाईट पाणी, याची व्यवस्था करूनच हे रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत उभारले आहे.
दि. २७ रोजी रात्री सात वाजता नवीन मुर्तीची विधीवत पूजा करून कामास प्रारंभ करण्यात आला. तसेच मंदिरासमोर बाकीचे धार्मिक विधी करण्यासाठी ब्रम्हवृंद रात्रभर विधी करत होते. त्याच वेळी नागठाणे, चाहुरवस्ती, जांभळेवाडी, सोनापूर व पंचक्रोशीतील नागरिकांनी बुधवारी रात्रभर श्रमदान करून रवळेश्वराचे मंदिर उभारले. त्यानंतर गुरुवारी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . एका रात्रीत हे मंदिर उभारल्यामुळे पंचक्रोशीत या संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू होती.