काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दक्षिणेच्या जवळच्या शहरापर्यंत तालिबानने धडक मारली असून आज सकाळी मझार ए शरीफवर जोराचा हल्ला सुरू केला आहे. त्यांना अफगाणिस्तानच्या फौजांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे, असे अफगाणी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तालिबानकडून सध्या प्रांतीय राजधानीबरोबर संपूर्ण प्रांतावर ताबा मिळवला गेला आहे. तालिबानकडून काबुलच्या शेजारील जिल्ह्यापर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे तालिबानी आता राजधानी काबुलपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर राहिले आहेत, असे लोगार प्रांताचे लोकप्रतिनिधी होमा अहमदी यांनी सांगितले.
अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघार घेण्यास केवळ तीन आठवडे शिल्लक राहिले असताना तालिबानने उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले गेले आहे. तालिबानने मझार ए शरीफ शहरावर वेगवेगळ्या भागांमधून हल्ले केले आहेत, असे प्रांतीय सरकारच्या गव्हर्नरचे प्रवक्ते मुनीर अहमद फरहाद यांनी सांगितले.
अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी बुधवारीच मझार ए शरीफला भेट देऊन संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या संरक्षणाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
गेल्या काही दिवसातच तालिबानने दक्षिणेकडील छोट्या छोट्या प्रांतांवर ताबा मिळवला आहे. आता अफगाण सरकारच्या ताब्यात मध्य आणि पूर्वेकडील प्रांतांचा ताबा राहिला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षणावर अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केल्यानंतरही आता अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या तावडीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कंदहार रेडिओ स्टेशनवर तालिबानचा ताबा
दरम्यान तालिबानने कंदहार शहरातील रेडीओ स्टेशन ताब्यात घेतल्याची घोषणा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या रेडिओ स्टेशनचे नाव बदलून “व्हॉईस ऑफ शरीया’ असे करण्यात आले आहे. या रेडिओवरून आता संगीत प्रसारीत केले जाणार नाही. तर केवळ इस्लामी धर्मग्रंथांचे वाचन आणि बातम्या प्रसारीत केल्या जाणार आहेत. तालिबानने कैक वर्षे मोबाइल रेडिओ चालवला आहे. पण कोणत्याही मोठ्या शहरातील रेडिओ स्टेशन चालवलेले नाही.
अमेरिकेचा दूतावास रिकामा करण्याची घाई
अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना माघारी नेण्यास मदत करायला 3 हजार सैनिकांची तुकडी शुक्रवारी दाखल झाली. उर्वरित तुकडी रविवारी येणार आहे. मात्र सैनिकांची ही तुकडी आल्यामुळे आता माघारीची 31 ऑगस्टची मुदत पाळता येईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.