संयुक्तराष्ट्रे – भारतातील सुल्ली डील या मुस्लीम महिलांना लक्ष्य करणाऱ्या ऍपच्या प्रकाराची संयुक्तराष्ट्रांच्या संघटनेकडूनही दखल घेण्यात आली असून संयुक्तराष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी डॉ. फेर्नांद डी वरेनेस यांनी म्हटले आहे की, भारतात मुस्लीम महिलांवर अशा प्रकारे होत असलेले अत्याचार हा अत्यंत निंदनीय प्रकार असून त्याचा व्यापक स्तरावर निषेध व्हायला पाहिजे. यातील दोषींवर तातडीने कारवाई केली जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुस्लीम महिलांच्या हिताचे तेथे काळजीपूर्वक रक्षण केले जाणे गरजेचे असून मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्याचे कामही थांबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. भारतातील काही युवकांनी मुस्लीम महिलांचे फोटो त्यांची अनुमती न घेताच या ऍपवर टाकले असून त्यात त्यांनी या महिला लिलावाने उपलब्ध असल्याचे दर्शवले आहे. पण त्यातून भारतात मुस्लीम महिला लिलावात उपलब्ध असल्याचे वातावरण निर्माण झाले असून त्या विषयी संयुक्तराष्ट्रांच्या प्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली आहे.